वडील - आठवणी रुपी ठेवा
सकाळी नियमित ५ वाजता उठून दिनचर्या सुरू करणारे
देवाची पूजा नित्य नियमाने श्रद्धेने करणारे
लहानपणी हात धरून रंकाळा तलावाच्या कठड्या वरून हात पकडून चालवणारे
घाबरू नको मी आहे असे म्हणून आधार देणारे आधारस्तंभ
नियमित अंबाबाई च्या मंदिरात जाऊन येणारे
संध्याकाळी सातच्या बातम्या बघून झाल्यावर देवासमोर दिवा उदबत्ती लाऊन परवचा न चुकता म्हणणारे
आई वडिलांवर अपार प्रेम करणारे
शाळेत २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी आम्हाला वेळेत सोडून स्वतः वेळेत ऑफिस ला पोहोचणारे
लाच घ्यायची नाही द्यायची नाही हे शिकवणारे आणि तत्त्वांशी एकनिष्ठ असणारे
कधीतरी मध्येच आईच्या स्वयंपाकाचे कौतुक करणारे
ऑफिस मध्ये पार्टी असली तरी त्या पार्टीत मांसाहार असतो म्हणून घरातून डब्बा घेऊन जाणारे
त्यांच्या लहानपणी त्यांना काही गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून आम्हाला आवर्जून घेऊन देणारे
शाळेत जाताना पूजेतून वेळ काढून माझ्या वेण्या घालणारे
जे आपल्याकडे नाही त्याचे वाईट वाटून घेऊ नका ज्यांच्या पायात चप्पल नाही त्यांच्याकडे बघून समाधानी रहा असे सांगणारे
माझे लग्न ठरल्यावर अपेक्षा न करता देत राहिलीस तर सुखी होशील असे सांगणारे ( जे मला अजून पर्यंत जमलेल नाही )
नातवाला जीव लावून आवर्जून त्याच्यासाठी ६ महिन्यातून ५- ६ दिवस माझ्याकडे येणारे
येताना खूप गोष्टी कौतुकाने घेऊन येऊन सढळ हाताने देणारे
सोसायटीच्या कामात स्वतःहून पुढाकार घेऊन सर्वांना एकत्र आणून मदत करणारे
सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलून सावरकरांचं वाक्य सांगणारे ' देह आणि देव याच्या मध्ये देश लागतो त्याच आपण देणं लागतो'
वयाच्या ७० व्या वर्षी गिरनार ची यात्रा करून येणारे
दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक असणारे बाबा तुम्ही शरीराने नसलात तरी तुमच्य आठवणी या कायम माझ्या बरोबर आहेत आणि आता आयुष्यभर त्याच्यावरच जगण्याचे बळ मी देवाकडे मागितले आहे.
Comments
Post a Comment