नाणेघाट मोहीम फत्ते
पुणे मार्गे माळशेज घाटातून गाडी ३१ डिसेंबरला सकाळी १०वाजता नाणेघाटाच्या पायथ्याशी पोहचली आणि व्यापारी मार्गे आमच्या मोहिमेला सुरवात झाली. दगड-धोंडे तुडवत नाणेघाट बघत चालत होतो. शरीराच्या ओझ्या बरोबरच पाठीवर पाण्याचे ओझे असल्यामुळे दम चांगलाच लागत होता पण तरी गड बघण्याची इच्छा व एक थरारक अनुभव अनुभवण्याची इच्छा यामुळे हळू हळू का होइना पण अर्धा घाट चढून गेल्यावर जेव्हा दरीकडे नजर टाकली आणि निसर्ग सौंदर्य बघून मनावर जो थकवा जाणवत होता तो काही क्षणात दूर झाला त्यामुळे शरीराचा थकवा पण फारसा जाणवला नाही...... याच बरोबरीने कोल्हापूर हायकर्सच्या सदस्यांचे प्रोस्ताहन आणि काकांच्या मार्गदर्शना मुळे अर्धा नाणेघाट चढून विश्रांती साठी एका ठिकाणी बसलो आणि खाली बघितले तर अर्ध्या तासात बर्याच उंचीवर पोहोचल्याचा आनंद झाला ...... मग परत चढायला सुरवात केली आता थोडेच चढायचे होते आणि सगळ्या पायऱ्या असल्यामुळे जास्त वेळ न काढता हळू हळू चढायला सुरवात केली तरी नाही म्हणता म्हणता १तस वरती पोहचायला लागला. गुहेच्या इथे पोहचल्यावर मात्र पहिल्यांदा बाटलीत गार पाणी भरून गटागटा प्यायले आणि मग जरा ऐतिहासिक नजरेने गुहा, जिथून आलो तो मार्ग आणि दगडात कोरलेल्या पायऱ्यांचे दर्शन घेतले, ते बघत असतानाच शशांक तळप याने Rock Climbing चा एक रोमांचक अविष्कार करून सगळ्यांचे मनोरंजन केले ........ गुहेत भिंतीवर मोडी लीपित काहीतरी लिहिले होते पण आपल्याला मराठी सोडून कोणतीच भाषा येत नसल्याने डोळेभरून आणि हाताने स्पर्श करून फक्त मनात ती लिपी साठवून ठेवली. तिथे फोटो सेशन झाले, एक तास भर तिथे गारवार्यात बसून पुढे गेलो , लगेचच एक भला मोठा हंडा दिसला. त्याचे वर्णन आधीच पेपरात वाचल्यामुळे त्याच्याबद्दल फारसे कुतूहल मनात नवते. तिथे सगळेजण आल्यावर त्याच्या बद्दल सागर पाटील याने ऐतिहासिक दृष्ट्या महत्व आणि माहिती दिली, पूर्वीच्या काळी हा व्यापारी मार्ग असल्यामुळे कर गोळा करण्यासाठी त्या हंड्याचा वापर केला जायचा. ते सृष्टी सौंदर्य बघून आणि माहिती गेई पर्यंत सूर्याने डोक्यावर आगमन केले होते. आता मात्र पोटातल्या कावळ्यांनी आवाज द्यायला सुरवात केली होती, नाण्याचा अंगठा तिथून जवळच होता पण तिथे सूर्यास्त बघण्यासाठी संध्याकाळी यायचा असा आदेश झाल्यावर खूप मस्त वाटले. त्यामुळे आम्ही थेट जिथे पठारावर जेवणाची सोय केली होती तिथे गेलो. मस्त गरमा गरम भाकरी, वांग्याची भाजी, पापड, लोणच आणि आमटी भात असे फक्कड जेवण करून जरा सावलीत विश्रांती घेतली आणि ५वाजत चित्तर कड्या वरून बाजूचे गड किल्ले बघण्यास रवाना झालो....... तिथे गेल्यावर गड किल्ले बघायचे सोडून मिलिंद गुणाजिच्या फार्म हाउसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, ते बघून झाल्यावर नाण्याचा अंगठा त्या कड्या वरून अगदी आपल्या अंगठ्या सारखाच दिसतो हे कळल्यावर अंगठा वर करू एक डोळा झाकून खरे कि खोटे हे पडताळण्यात आले... आणि त्या वरून हे खरे आहे हे निश्चित केले.... परत फोटोग्राफी झाल्यावर पळत पळत नाण्याच्या अंगठ्याकडे गेलो कारण सूर्यास्त तिथून बघायचा होता पण चालणे आणि चढण असल्यामुळे मी मध्ये बसून सूर्यास्ताचे दर्शन घेतले आणि परत जिथे राहायची सोय केली होती तिथे गेलो....साधारण आठ वाजले होते.... मग सगळे ताजे तवाने होऊन आल्यावर मस्त पैकी दम शेराज खेळून गरगरीत जेऊन शेकोटी करून गाण्याच्या भेंड्या खेळत नाविन्वार्षाचे आगमन केले........ उद्या जिवधनने बोलावल्यामुळे आज झोप होणे गरजेचे होते त्यामुळे मी झोपले........ जिवधनच अनुभव आपण उद्या वाचू.
Comments
Post a Comment