पन्हाळा पावनखिंड मोहीम फत्ते २१-२२ जुलै २०२३
शनिवारी दिनांक २० जुलै २०१३ सकाळी सातच्या बस ने पन्हाळ्यावर पोहचलो, पन्हाळ्यावर गेल्यावर सगळ्यांना ओळखपत्र दिली गेली. त्यानंतर वीर शिवा काशिद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचे पूजन प्रमुख पाहुणे इतिहासकार श्री. अप्पा परब आणि डॉ. अमर अडके यांच्या हस्ते होऊन त्यांच्या भाषणातून समजले की हि एक ऐतिहासिक मोहीम आहे. त्यामुळे तेव्हाच ठरवले संपूर्ण मोहीम शिवाजी महाराजांच्या घोषणा देत पूर्ण करायची.
साधारण ९ वाजता मोहिमेला सुरवात करून दगड , चिखल, जंगल यातून आम्ही चालत होतो, थोड्याच वेळात डोंगर संपून आम्ही मसाई पठारावर आलो. मुसळधार पाऊस, जोराचा वारा आणि पठारावर उतरलेले ढग हा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला. हा अनुभव मनाला आणि शरीराला आनंद देणारा होता. पठारावर मस्त हिरवी शाल पांघरल्या प्रमाणे पठार दिसत होते. दूरदूर पर्यंत हिरवेगार पठार आणि व त्यावर उगवलेली छोटी छोटी पांढरी फुले त्यांना सोबत करत होती तब्बल चार तासांनी मसाई पठार पार करून एका शाळेत जेवणासाठी थांबलो. तिथे पोटोबा करून परत उत्साहाने दगड चिखल तुडवत मोहिमेस सुरवात केली. आता मात्र करपेवाडी येई पर्यंत फक्त चालत राहायचे होते. वाडीतून जाताना दोन वाडींच्या मध्ये भाताची शेती वाऱ्यावर मस्त डुलत होती, काही ठिकाणी भाताची लावणी चालू होती, तर काही ठिकाणी नांगरणी सुरू होती. त्यातूनच आम्ही बांधा वरून बांध पर करत संध्याकाळी सात वाजता करपेवाडी मध्ये पोहचलो. तिथे पोहचल्यावर आधी राहायची सोय पहिली, घर स्वच्छ होते, तिथे जाऊन पहिल्यांदा गोठ्यात कपडे बदलल्यावर जरा बरे वाटले, आयुष्यात पहिल्यांदा गोठा ही changing room होती व काहीही कटकट न करता १० मिनिटात आम्ही झोपायच्या तयारीला लागलो.
आत्ता ही मोहीम करताना आम्हाला तहान लागली, भूक लागली, दमलो की थांबून आमची सोय बघून कोल्हापूर हायकर्स ची टीम पुढे घेऊन जायची पण जेव्हा पन्हाळगडला अफजलखानाने वेढा घातलेला तेव्हा ही मराठ्यांची फौज कशी काय त्या पावनखिंड पर्यंत पोहचली असेल आणि ते पण शत्रूं पासून बचाव करत करत हे त्यांचे त्यांनाच माहिती. तेव्हा तर घनदाट जंगल आणि त्यातून त्यांना रस्ता शोधत जावे लागले असेल. खरच त्यांना मानाचा मुजरा आहे.
पहिला दिवस १५ - १६ किलोमिटर चालून संपला आता दुसरा दिवस उजाडला सकाळी ५ वाजता २१ जुलै २०१३ जबरदस्त थंडी आणि रिमझिम पाऊस आजची मोहीम निलगिरीच्या जंगलातून सुरू झाली साधारण ५-६ किलोमिटर चालल्यावरच माझी energy कमी झाल्याचे जाणवत होते. पण मन सांगत होते की तू करशील मोहीम पूर्ण या आशेवर चालत होते. ओढ्यातून आणि जंगलातून चालताना घोट्यापर्यंत च्या चिखलात पाय रुतून बसतील की काय अशी भीतीच वाटतं होती. पण नशीब चांगले म्हणून सुखरूप रित्या आम्ही सर्व जण रस्त्या पर्यंत आलो, तिथे मस्त एक पाण्याची टाकी होती तिथे हात पाय धुऊन पुढे जायला निघालो. साधारण २ किलोमिटर पर्यंत टेम्पोत बसून गेलो. पावनखिंड पर्यंत पोहचलो, तिथे प्रार्थना करून घोषणा देऊन आम्ही निघालो.
हर हर महादेव ! शिवाजी महाराज की जय !
Comments
Post a Comment